शुक्रवार, ७ मार्च, २०२५

तू लढ!





 हे स्त्रिये... माते ....जननी, तुला उद्देशून; 

                     तू युगे-युगे या जुलमी पितृ सत्तेच्या जोखडाखाली स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजत राहिली... तुझं अस्तित्व तू स्वतः निर्माण कर! तुटू दे काही परंपरा, तुटू दे ते रितीरिवाज, तुटू दे ती सर्व बंधने जिथे -जिथे तुझे अस्तित्व अडवले गेले.. तुझ्यासाठी तूच उभी रहा नको वाट पाहू इतर कोणाच्या मदतीची... नाहीतर तुझा पुन्हा एकदा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही... आणि आणि यावर मग स्वतःची पोळी भाजून घेणारे चार-चौघेजण चार दिवस बोलत राहतील काही तर काहीजण भावना विवश होऊन बोलत राहतील पण यातुन कोणताही बदल होणार नाही.तेव्हा तू स्वतः लढ.


                नारीशक्ती ...महिला दिन... हे फक्त "पेट्रॅकल सोसायटीने" महिलेला दाखवलेला ठेंगाच! कारण आजही हीच लोक महिला दिन ठरवतात.. साजरा करतात .चार-दोन जणींचे गुणगान गातात.. आणि मग आजच्या महिलांना त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं ही कृतज्ञतेची भावना तिला कधी या पुरुषी मानसीकतेला नाही म्हणायची ताकदच देत नाही. एखादी गोष्ट न पटणारी असली तरी तिच्यावर तिला भाष्य करण्यासाठी जमतच नाही. कारण हीच लोक एकीकडे स्त्रियां विरोधी गोष्टींना खतपाणी घालत असतात आणि दुसरीकडे महिलांना नारी शक्ती... देवी,माता म्हणून त्यांचा आवाज दाबतात... कारण यातून प्रत्येक पुरुषी मानसिकतेला फक्त आपल्यापेक्षा ती वरचढ नको हेच हवंय! मग हे घरात असो की दारापासून- वेशीपर्यंत.

खरं म्हणजे स्त्रीवादाचा आव आणून जास्त काय होणार नाही! म्हणजे हा स्त्रीवाद केव्हा आहे जेव्हा पुरुषवाद आहे.  ही पुरुषी मानसीकता कुठेतरी आवाज दाबते. आणि मग आपण स्त्रीवादाचे झेंडे घेऊन मिरवण्यास मोकळे. मुळात प्रत्येक पुरुषाने हा स्वतःला प्रश्न केला पाहिजे की,"आम्ही स्वातंत्र्य देणारे कोण?"समाज हा विविधअंगी असतो, त्यात सर्व गोष्टींचा समावेश होतोच मग त्यात कोणी मोठा-कोणी बारीक हे नक्कीच असणार; आणि असं असणे पण काही चुकीचे नाही कारण.... कोणाचे तरी कोणावर वर्चस्व असेल तरच या व्यवस्थेची घडी बसेल. पण हे वर्चस्व मिळवण्यासाठी/मिळण्यासाठी काही निरपेक्ष ... निभेद... अलिंगी (लिंगाधारित भेदभाव नसणे) आयाम असायला हवेत... ज्यातून केवळ बुद्धी व नेतृत्वाचा कस लागेल व प्रत्येक जण स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल.

यात स्त्रीवर प्रभाव पाडण्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टींचा वापर केला जातो एक-सॉफ्ट पॉवर म्हणता येईल  व दोन-हिंसा दबाव कोंडी आणि धाक अर्थात दबावतंत्र व हिंसाचार! 

एक- सॉफ्ट पॉवर:-

     सॉफ्ट पॉवरचा विचार करता... यात ही लोक स्त्रियांना गोड बोलतात प्रेमाने वागतात प्रेमाने त्यांना हवे ते करून घेतात, काही गोष्टींची खरेदी भेटवस्तू देऊन मन धरणी करतात अर्थात या गोष्टी स्त्रिया देखील पुरुषांबाबत करतात. तेव्हा ही गोष्ट बुद्धीच्या सामर्थ्यावर अवलंबून असल्याकारणाने यात काही चुकीचे नाही असे म्हणायला हरकत नाही. 

दोन - दबावतंत्र व हिंसाचार:-

 दुसऱ्या गोष्टीचा विचार करता (ज्यात हिंसा, दबाव, कोंडी ,धाक, मारहाण इ.) स्त्रीला तिच्या अस्तित्वासाठी कोठून झगडायचे आहे ते समजते. म्हणजे आज साक्षर स्त्रियांचा लढा हा आम्हाला समाजात बरोबरीचे स्थान दिले जात नाही किंवा आम्हाला नेहमी दुय्यम समजले जाते यासाठीच आहे. (उदा. आयटी सेक्टर मध्ये काम करताना दिली जाणारी पदोन्नती मध्ये  पुरुषाला दिले जाणार काही प्रमाणातील  प्राधान्य) 

पण याची दुसरी बाजू हीदेखील आहे की, यातील काही स्त्रियांना.. खास करून ग्रामीण भागातील स्त्रियांना अक्षरशः जीव देण्याची वेळ येते. म्हणजे ती तिच्या नवऱ्याला तुमचं चुकत आहे किंवा काही गोष्टींची विचारणा त्यांच्याकडे केली,ति तिच्या मुला बाळांच्या उजव्व भविष्यासाठी काय चुकीचं आहे व काय बरोबर हे बोलली तरी पुरुषी अहंकार दुखावतो, तो तिच्यावर हात उचलतो तिच्यावर हिंसाचार करतो. पण ती त्यावर त्याला उत्तर म्हणून पुरुषावर हात उचलत नाही! नाही म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करता हे प्रखरपणे दिसून येते की, आपण कितीही झाशीची राणी, सावित्री, बहिणाबाई यांचे गोडवे गायले तरी हे कठोर सत्य आहे की त्यांनी त्यांचे अस्तित्व निर्माण केले होते बुद्धी व नेतृत्वाच्या जोरावर. म्हणजे यातून स्पष्ट होते की येथे तेच वर येऊ शकतात ज्यांच्यात लढायची स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची अर्थात वेगळी ओळख निर्माण करण्याची आग असेल ...हिम्मत असेल. 

       मी येथे स्त्री सुरक्षा... समान हक्क.. अत्याचार, त्यावर उपाययोजना.. यावर बोलतच नाहीये कारण हे सर्व विषय द्वितीय स्तरावरील आहेत जेव्हा तुम्ही साक्षर व्हाल तेव्हा तुम्ही काय चुकीचे व काय बरोबर हे पाहू शकाल तेव्हा तुम्ही तुमची मते ठामपणे मांडू शकाल. तेव्हा खऱ्या अर्थाने सुरक्षा... समान हक्क... आत्याचार इ. गोष्टींवर भाष्य करणे उचित ठरेल. कारण जेव्हा तुम्ही साक्षर व्हाल आणि तुमची धाव फक्त "चुल ते फार फार तर घराचा उंबरठा " इथपर्यंत मर्यादित ठेवणार नाही तेव्हा कुठेतरी बदल घडेल. साक्षर होऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडाल चूल आणि मूल कुठेतरी ही प्रथम मोडीत काढाल जेव्हा आपण आपल्या पायावर उभे असाल... तेव्हा समान हक्क.. अत्याचार.. सुरक्षा इत्यादी प्रश्न उरणारच नाहीत. कारण अशा प्रश्नांना आपण पाय फुटूनच देणार नाही. (अर्थात तुमच्यावर अन्याय होताच आवाज उठवाल) व पर्यायाने हे प्रश्न निर्माणच होणार नाही. 

शेवटी एवढाच म्हणेल की, 

             प्रत्येक संकटासाठी तुला येसूबाई व्हायचंय...                    तुला ज्ञानासाठी सावित्री व्हायचंय; आणि ते होताना तू कोणा जोतिबाची अपेक्षा करू नको, तुला दुसऱ्याच्या जगण्यासाठी सिंधुताई सपकाळ व्हायचंय.... आणि तुला यातील काहीच नाही होता आलं तर निदान स्वतःसाठी लढा देऊ शकशील एवढी हिंमतवान हू ! मला माहित आहे हा प्रवास तुझ्यासाठी फार कठीण असेल पण या प्रवासात माझ्यासारखा एखादा सखा तुला हात देईल.. तो हात उसनाच समज नाहीतर तू त्यावर अवलंबून राहशीलतू...तु लढ.. तू खचू नको.. तुझ्या प्रवासात प्रत्येक बोचणाऱ्या काठ्यानंतर तुझ्या स्वागतासाठी फुलांची माळ असेल... तू फक्त लढ! 


                                -Avinash D.Murumkar